पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध असलेल्या पर्यावरण वाहिनीच्या वतीने आज बल्लारपूर पोलीस स्टेशन तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे पक्षी जलपात्रांचे मोफत वाटप करण्यात आले. प्रत्येक उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईमुळे अनेक पक्ष्यांचा जीव जातो. ही बाब लक्षात घेता, पर्यावरण वाहिनी दरवर्षी लोकसहभाग व जनजागृतीच्या माध्यमातून विविध वार्डांमध्ये व सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी पक्ष्यांसाठी जलपात्रे मोफत वितरीत करत आहे.
आजच्या उपक्रमांतर्गत प्रथम बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये जलपात्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले, साळुंखे साहेब, श्रीकांत मेंढे, राहुल चांदेकर तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अंबादास टोपले साहेब यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “पक्षांना वाचविण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण वाहिनीच्या उपक्रमामुळे समाजात जनजागृती निर्माण होईल आणि या लहान जीवांना जीवनदान मिळेल.” त्यांनी स्वतः एक जलपात्र भरून पोलिस स्टेशनमधील झाडावर लावून प्रत्यक्ष कृतीतून उदाहरण घालून दिले.
यानंतर शासकीय ग्रामीण रुग्णालय येथेही उपस्थित डॉक्टर व कर्मचार्यांना जलपात्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. पिंपळशेंडे, डॉ. प्राजक्ता बावनकर, डॉ. पल्लवी भगत, डॉ. कल्याणी कांबळे, डॉ. संदीप घोरमोडे यांच्यासह नर्सेस व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टरांनी पर्यावरण वाहिनीच्या या उपक्रमाचे अभिनंदन करत पक्ष्यांच्या जिवाची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी पर्यावरण वाहिनीचे अध्यक्ष मोहम्मद शरीफ यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, “शहर स्वच्छ ठेवणे, कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण व विल्हेवाट करणे, झाडे लावणे, पशु-पक्ष्यांना पाणी मिळवून देणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची भूमिका आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.“
या उपक्रमात उपाध्यक्ष विनायकराव साळवे, सचिव मनोहर माडेकर, संस्थापक सदस्य सतीश गोगुलवार, अजय अलोने, सुधीर कोरडे, मोहम्मद सलमान सर, राजू मारपल्लीवर, संजय श्रीवास्तव, अश्विनी मेश्राम, सपना रेवेली, सह्याद्री रेवाली, मोहम्मद अल्तमश आदी सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पर्यावरण वाहिनीचा हा उपक्रम समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.







